Friday, June 4, 2021

आमची बाग... हिरवाई.




काही वर्षांपूर्वीचा आमचा प्लाॅट.आजूबाजूच्या लोकांसाठी डंपिंग ग्राउंड, काटेरी झुडपे,गवत आणि रानटी झाडांचा पालापाचोळा.
        घर बांधायचं ठरवलं . स्वच्छता सुरू झाली.मटेरियल, कामगार, मोठी वर्दळ आणि काही दिवसांनंतर आमचं घरटं आकाराला आलं.
या सुंदर वास्तूला साजेशी निसर्गाची सजावट करायची हे आम्ही आधीच ठरवलं होतं.आणि रहायला आल्या बरोबर या निसर्गरम्य रांगोळीचं रेखाटन सुरु झालं. आज आमच्या वास्तू भोवती फेर धरुन दाटीवाटीने उभी असलेली विविध झाडे वेली पहाताना त्यांना वाढवताना घेतलेल्या कष्टांचा विसर पडतो. तुळशी वृंदावनावर ओंजळीत फुले घेऊन उभी  पांढरीतगर  , शेजारी आमच्या ब्रह्मा, विष्णु ,महेश या आम्रवृक्षापैकी महेश, त्याच्या शेजारी उभी लाजरी सीताफळ, जवळच  आडदांड छोटू....नारळ, अंजीराच्या झाडांशी उगाच जवळीक करु पहाणारी जास्वंदी, त्यांच्याकडे प्रेमळ शिस्तप्रिय नजर ठेवणारा आमचा ब्रह्मा....तिघातला मोठा आम्रवृक्ष.
मग पुन्हा वेगळी  गोलमटोल जास्वंदी, आसमंत सुगंधी करणारा कढीलिंब, काही अंतर राखून दुसऱ्या गटातील सरदार...पेरुचं झाड.
शेजारी लिंबू, राम लखन ही दोन चिकूची झाडं आणि त्यांच्या जवळच मान उंचावून सगळीकडे नजर ठेवणारा आमचा विष्णु....मधला आम्रवृक्ष.
त्यांना सोबत करणारी पामच्या झाडांची गर्दी. जवळच आवळा,पांढरी जास्वंद, आणि पेरुचं मोठं झाड.रोज  हिरवे पिवळे पेरुंची उधळण करणारा खोडकर ...बडा सरदार.
जागा मिळेल तिथे लहान मोठी फुलझाडे आणि आडूळसाच्या रांगेत डोकावून पहाणारी जास्वंदी,कोरांटी आणि अबोली.
प्रवेशद्वाराजवळ जाणारांना निरोप आणि येणाऱ्यांना स्वागत करणारा सोनचाफा.
बघता बघता आमच्या समोर मोठे झालेले हे आमचे सगेसोयरे.विनातक्रार  फळा फुलांची ओंजळ रीती करणारे.दिवसरात्र  विविध पक्ष्यांना आसरा देऊन त्यांची किलबिल ऐकताना सळसळणारे आणि आम्हाला भान हरपून आनंदाची उधळण करणारे.
सातासमुद्रापारच्या नातवंडांच्या घराच्या विस्तिर्ण बॅंक यार्ड मधील झाडांची वेगवेगळी फळे पहाताना आमच्या घरट्यातली फळं, फुले दाखवून आनंदाची देवाण-घेवाण करताना होणारा आनंद, आमच्या वृक्ष वेली सारखाच स्वच्छ,ताजा,निरागस आणि जगण्याची उमेद  वाढवणारा.

















सुभाष साबडे

No comments:

Post a Comment

aakashkandil

आकाशकंदील करतानाच व्हिडिओ  पूर्ण झालेला आकाशकंदील